पुणे : मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी चिनी वस्तूंसह ध्वजाची होळी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘रिपाइं’ने चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच जगभर पसरलेल्या कोरोना महामारीला चीन जबाबदार असल्याच्या कथित पार्श्वभूमीवरही हे होळी आंदोलन करीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन ‘रिपाइं’ने केले. यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कोथरूडमधील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून हे आंदोलन झाले. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी केशव पवळे, बाबासाहेब तुरूंकमारे, जितेश दामोदरे, रेखाताई चव्हाण, उज्जवलाताई सर्वगोड, दस्तगीर शेख, ऍड आनंद कांबळे, शिवाजीराव कांबळे, दीपक सगरे, वसंत ओव्हाळ, प्रमोद दिवाकर, वसंतराव वाघमारे, सुभाष पासोटे, रमेश सोनवणे, सत्येश हिरवे, नवनाथ सोनवणे, अंकुश भोसले, संदीप पौळे, अर्जुन गव्हाणे आदी उपस्थित होते.

‘चिनी वस्तूंवर बहिष्कार घालूया, शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहूया’, ‘दळभद्र्या चिनी वस्तूंचा धिक्कार असो, चिनी वस्तू वापरणार नाही’, ‘आम्ही चिनी वस्तू चिनी ऍप वापरणार नाही’ अशी शपथ घेत कार्यकर्त्यांनी चीनला धडा शिकवण्याचे आवाहन केंद्र सरकारकडे केले. तसेच चीनच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

बाळासाहेब जानराव, ऍड मंदार जोशी यांनी ‘चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून यापुढे भारतीय नागरिकांनी कोणत्याही प्रकारची चिनी वस्तू वापरू नये किंवा विकू नये, असे आवाहन केले. चीनची आर्थिक कोंडी करून आपल्या भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

आपली प्रतिक्रिया
आपले नाव

Solve : *
24 − 19 =